Tuesday, March 23, 2010

(21st February is International Mother Language Day)


श्यामची आई हे पुस्तक म्हणजे मराठी बाल-कुमार साहित्यातला अनमोल संस्कारांचा ठेवा. एक अभिजात साहित्यकृती.

२०१० हे या पुस्तकाचं अमृतमहोत्सवी वर्ष. सलग ७५ वर्ष एखादं पुस्तक जनमानसात रुजून बसणं ही काही सोपी गोष्ट नाहीं. आईचं प्रेम हे या पुस्तकाचं मध्यवर्ती सूत्र.

एका साध्या, बाळबोध, सुसंस्कृत घराण्यातल्या संस्कृतीचं आणि त्या वेळच्या समाजाचं चित्रण या पुस्तकात आलं आहे. श्यामची आई म्हणजे साने गुरुजींच्या बालपणीच्या आठवणी. तुमच्या आमच्या बालपणासारख्या त्या रम्य-सुंदर मात्र नाहीत.हे बालपण खडतर आहे, गरीबीचं आहे. पण या सगळ्याला पुरुन उरतो, तो आईनं कलेला प्रेमाचा वर्षाव, दिलेली मूल्यं आणि कोणत्याही खडतर प्रसंगातून आपलं चारित्र्य अभंग राखून बाहेर कसं पडायचं याचं मिळालेलं शिक्षण.

या कादंबरीच्या रचनेतही वेगळेप़ण आहे. श्याम आपल्या मित्रांना रोज रात्री एक याप्रमाणे ४२ रात्री आपल्या आईच्या आठवणी सांगतो. अतिशय साधी, सोपी आणि ह्रदयाला हात घालणारी भाषा हे याचं वैशिष्ट्यं.

साने गुरुजींच्याच शब्दात सांगायचं तर" ह्रदयातला सारा जिव्हाळा इथे ओतला आहे. या गोष्टी लिहिताना माझे ह्रदय अनेकदा गहिवरून आणि उचंबळून आले आहे."

स्वातंत्र्यसेनानी म्हणून १९३३ मध्ये नाशिकच्या तुरुंगात असताना पाच दिवसात साने गुरुजींनी या आठवणी लिहून काढल्या. १९३५ मध्ये पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिध्द झाली. या पुस्तकानं प्ऱभावित झाला नाही असा वाचक विरळा. आचार्य प्र. के. अत्रे यांनी त्यावर काढलेला चित्रपटही खूप गाजला आणि त्याला राष्ट्रपतींचं पहिलं सुवर्णकमळ मिळालं.

साने गुरुजी हे महात्मा गांधीचा प्रभाव असलेले स्वातंत्र्यसेनानी, विचारवंत होते. त्यांनी सत्याग्रहात भाग घेतला, भूमीगत राहून चळवळ चालवली. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून आमरण उपोषणाला बसले. सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय संस्कृतीचं भान असलेले ते लेखक होते.

'भारतातल्या प्रांताप्रांतात हेवेदावे असू नयेत, एकमेकांनी एकमेकांच्या भाषा शिकाव्या, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी ते प्रयत्न करीत.

आंतर भारती हे त्यांचं स्वप्नं होतं. यासाठीच आजच्या मातृभाषादिनी त्यांची आठवण ठेवणं फार गरजेचं आहे.

मराठीवर नितांत प्रेम करून, त्यात श्यामच्या आई'सारखं जागतिक दर्जाचं साहित्य त्यांनी लिहिलं. इतर भाषांतलं साहित्य मराठीत आणलं.

त्या भाषांचा आदर केला.

आज गरज आहे ती याच विचारांची.

Source--http://blog.prathambooks.org/2010/02/blog-post_21.html
IAS OUR DREAM COMPLETED SEVEN YEARs ON AUGUST 13,2016

Blog Archive