Thursday, December 15, 2011


समोरच्याच्या दडपणाची, भीतीची, दुखाची मजा घेण्याची विकृती समाजात नव्याने तयार झाली आहे. त्यातून जर बाहेर पडायचं असेल तर महिलांनी, मुलींनी स्वत सक्षम व्हायला हवं आणि कुटुंबांनी, पालकांनी संवेदनशील आणि जबाबदार व्हायला हवं. येत्या शनिवारी जगभर सार्ज‍या होणार्‍या मानवी हक्क दिनानिमित्ताने..
‘आई, तू मला शेजारच्या काकूंकडे नकोस ना पाठवू. त्यांचा दादा मला अजिबात आवडत नाही. नुसता मला जवळ बसवून प्रश्न विचारतो, मला गुदगुल्या करतो.’
- त्यावर आई तिलाच दटावते. ‘तू लहान आहेस म्हणून तुझे तो लाड करतो, त्यात काय इतकं.’ मुलगी बिचारी आईच्या म्हणण्याचा अर्थ आणि ‘त्या’ दादाच्या वागण्याचा अर्थ स्वतच लावत बसते; पण हळूहळू तिच्या सर्व हालचाली संकोचतात, ती दबून राहू लागते. तो दादा दिसला की, जीव मुठीत धरून पळते किंवा लपते. ही तिची तिने तिच्या पातळीवर घेतलेली भूमिका असते; पण यामुळे आपल्या चिमुरडीच्या मनावर दडपण आले आहे, हे तिच्या आईला लक्षात येत नाही.

दुसर्‍या एका प्रसंगात कॉलेजमध्ये जाणारी मुलगी आपल्या आई-बाबांना सांगू पाहते की, कॉलेजच्या कट्ट्यावरची मुले मी दिसली की घाणेरडी गाणी म्हणतात, चालता चालता धक्का देऊन चालतात. बाबा तुम्ही याल का कॉलेजात? त्यावर आईच फटकन म्हणते, ‘जरा नटणं, मुरडणं कमी करा कॉलेजमध्ये गेल्यापासून फारच वाढलयं ते, हे असं राहिलं तर असंच होणार!’ बाबाही आईच्या म्हणण्याला दुजोरा देतात. मुलीला प्रश्न पडतो की, मी चांगलं राहू नको का? माझ्या राहण्याचा आणि त्या मुलांच्या छछोर वागण्याचा काय संबंध? अर्थात, तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळतच नाहीत. रोज कॉलेज कट्टा ते वर्गापर्यंतचा तिला वाटणारा जीवघेणा प्रवास ती कशीबशी मैत्रिणींबरोबर, तर कधी एकटी करत असते. पण कधी कधी तिच्यावरचा ताण इतका वाढतो की, ती कॉलेजला जाण्याचेही टाळू लागते. आपल्या मुलीच्या मनातील ही भीती तिच्या पालकांना समजू नये का?

कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून होणारे अन्यायकारक वर्तन, सहकारी करत असलेली खालच्या पातळीवरची चेष्टा, नवर्‍याला, सासूला सांगायला गेलं तर तिच्या स्वातंत्र्यावरची गदा नक्कीच असते. तर कधी परिस्थितीच इतकी बिकट असते की, तसल्या वातावरणातही नोकरी करण्यावाचून पर्याय नसतो. रोज मनावर दगड ठेवून काम करणं तिच्या अंगवळणी पडतं. पण त्याचा तिच्या मनावर आणि शरीरावर जाणवण्याइतपत परिणाम होतो. पण तिची ही घुसमट तिच्या कुटुंबाने समजूनही घेऊ नये का?

रस्त्यावरून जाताना, प्रवास करताना, चित्रपट पाहायला गेले असता किंवा अगदी आपल्या घराच्या जवळपासही मुलींना/महिलांना छेडछाडीच्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. मुली शिकल्या, कुटुंब पूर्वीच्या तुलनेत सुजाण झालीत, समाज बदलला; पण म्हणून घराच्या आसपासही संध्याकाळी सातनंतर मुली, महिला बेधडक वावरू शकतील, असे सुरक्षित वातावरण आजही आपल्याकडे नाही. आज किती पालक आमच्या मुलीला असा असा अनुभव आला म्हणून बदनामीची भीती बाजूला ठेवून पोलिसांत विनयभंगाची तक्रार करतात? आज किती मुली आपल्याला घराबाहेर होणार्‍या या त्रासाबद्दल पालकांना कनव्हिन्स करू शकतात, स्वत पुढे होऊन या छेडछाडीविरुद्ध तक्रार करतात? भीती, लाज, संकोच, आई-वडिलांची प्रतिक्रिया म्हणून त्याही शांतच बसतात.

या सर्व परिस्थितीला घराबाहेरचं असुरक्षित वातावरण जबाबदार आहे म्हणून अत्याचारग्रस्त मुली, महिला आणि त्यांचे कुटुंब आपले हात झटकू शकत नाही. यात छेडछाड करणारे, विनयभंग करणारे मुलं, पुरुष जबाबदार असतात तितक्याच हे सर्व प्रकार तोंड दाबून सहन करणार्‍या मुली, महिला जबाबदार असतात. घरातील आपल्या मुली, महिलांवरचा हा ताण समजून न घेणारे पालक जबाबदार असतात, तसेच आपल्या मुलांमुळे कोणीतरी बाहेर पडायला, खुलेपणाने वावरायला बिचकतंय, आपल्या मुलांचं हे सामाजिक वर्तन समजून घेऊन त्याला आळा घालायला कमी पडणारे पालकही तितकेच जबाबदार असतात.

एखाद्या मुलीकडे बघून कॉमेन्टस् पास करण्यापासून ते एखाद्या मुलीवर बलात्कार करण्यापर्यंतच्या गुन्ह्यांमध्ये मुलं, तरुण किंवा प्रौढ पुरुषही असतात. आणि अशा समस्यांनी ग्रस्त पीडितांमध्ये सहा महिन्याच्या मुलीपासून ते साठ वर्षांपर्यंतच्या वृद्धांपर्यंतच्या महिला असतात. अठरा वर्षाखालील मुलं जर छेडछाड, विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये सापडली, तर त्यांना विधीसंघर्षग्रस्त मुलं म्हणून त्यांनी केलेल्या कृत्यामागची कारणं समजून घेऊन ते सुधारावे यासाठी प्रयत्न केले जातात आणि आरोपी अठरा वर्षावरील असल्यास त्या आरोपीस कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल होऊन शिक्षा दिली जाते. पण हे तेव्हाच घडतं जेव्हा अन्याय झाला म्हणून पोलिसांकडे त्या संदर्भातील तक्रारी नोंदवल्या जातील; पण असं सहसा घडत नाही. आणि हे असं घडलं आणि त्याबाबतची शिक्षा आरोपीस झाली असली, तरी प्रसारमाध्यमे त्याची हवी तशी दखल घेत नाही. छेडछाड, विनयभंगाबाबत अशा सर्व पातळीवर लपवाछपवीचा प्रकार असेल, तर गुन्हेगारांना शिक्षा, बिघडलेल्यांना समज आणि पीडित महिला, मुलींना न्याय, सुरक्षा, विश्‍वास आणि ताकद मिळणार कशी? समोरच्याच्या दडपणाची, भीतीची, दु:खाची मजा घेण्याची विकृती समाजात नव्याने तयार झाली आहे. त्यातून जर बाहेर पडायचं असेल तर महिलांनी, मुलींनी स्वत: सक्षम व्हायला हवं आणि कुटुंबांनी, पालकांनी संवेदनशील आणि जबाबदार व्हायला हवं.

आपली मुले प्रमाणापेक्षा जास्त इंटरनेट वापरताय, नको त्या मुलांबरोबर राहताय, घरापेक्षा बाहेर रमताय तर पालकांनी चिकित्सक होऊन त्याची दखल घ्यायलाच हवी. मुलांच्या वागण्यावर पोलिसी बंधनं नकोत; पण जागरूक नजर जरूर हवी. कारण नको त्या वयात नको ते पाहिल्यामुळे, नको त्या गोष्टींची माहिती चुकीच्या पद्धतीने मिळाल्यास आपल्या मुलांच्या हातून हे असे गुन्हे होणारंच हे पालकांनी जरूर लक्षात घ्यावे. मुलींच्या पालकांनीही वाढत्या वयातील आपल्या मुलींच्या मनातील चलबिचल, तिच्या मनातला संकोच, दडपण, भीती हे समजून घ्यायला हवे. मुळात घराबाहेर होणारे हे विनयभंगाचे प्रकार समजून घेऊन त्यावर रिअँक्ट व्हायला मुलींना जमतेच असे नाही. ती परिस्थिती कशी हाताळावी याची समज मुलींमध्ये नसते. मुलींचा आई-वडिलांशी संवाद नसतो, तसा संवाद साधला जाईल इतका मोकळेपणा नसतो आणि त्यामुळे कुटुंबातच विश्‍वासाचे नाते नसते. त्यामुळे मुली या विषयावर घरात मोकळ्या होऊ शकत नाही. आपल्या पाठीमागे कोणी उभेच राहणार नाही, या भीतीने छेड काढणार्‍या मुलाला थेट जाब विचारू शकत नाही की, त्या मुलांची तक्रार त्याच्या पालकांकडे जाऊन करू शकत नाही. या अनेक कारणांनी मुलींचे घाबरणे, सहन करण वाढते आणि तिकडे छेड काढणार्‍या मुलांची हिंमत आणि समाजात अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढते.

स्त्रीला तिचं स्त्रीत्व जपता येणं हा तिचा मूलभूत मानवाधिकार आहे. त्यासाठी प्रथम तिलाच जागरूक होऊन, निडर होऊन कायद्याचा हात धरून पुढे व्हावे लागेल. असं झाल्यास ती, तिचं स्त्रीत्व आणि तिचा आत्मसन्मान नक्कीच सुरक्षित राहू शकेल.

काय करता येऊ शकते?

१) या अशा प्रसंगांना सामोरे जाताना मुलींनी, महिलांनी स्वत:च स्वत:ची हिंमत वाढवावी. छेडछाडीचा, ईल कृती अथवा बोलण्याचा अनुभव एकदा जरी आला तरी त्या मुलाला, पुरुषाला तिथल्या तिथे टोकण्याची, रोखण्याची, जाब विचारण्याची हिंमत दाखवावी. कारण एकदा सहन केले तर हे अनुभव रोजच तुमच्या वाट्याला येतील. ज्यामुळे समाजात वावरण्याचा तुमचा आत्मविश्‍वास,आत्मसन्मान ढळेल.
२) छेड काढणारे तुमच्या परिचयातले असले, तरी त्यांच्याविरुद्ध कसे बोलू, अशी मुळुमुळु भूमिका घेऊ नका, त्यांची भीड चेपल्यास त्यांची मजल याहीपुढे जाऊ शकते.
३) आपली छेड काढणारा कोणी एकटा-दुकटा नसून मोठा समूह त्याच्या सोबत आहे, असे लक्षात आल्यास सरळ त्याच्याकडे दुर्लक्ष केले आहे, असे दाखवावे. झालेल्या प्रसंगाबद्दल आपल्या पालकांना, मित्रमैत्रिणींनी सांगावे. असे प्रसंग कॉलेजात किंवा अँाफिसच्या ठिकाणी झालेले असल्यास शिक्षकांशी किंवा संबंधित अधिकार्‍यांशी बोलावं आणि अशा कृतींविरुद्ध सामूहिक अँक्शन घ्यावी.
४) विनयभंगाच्या गुन्ह्यांसाठी कायद्यात पुरेशा तरतुदी आहेत. त्याची माहिती सुजाण नागरिक म्हणून मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी जरूर करून घ्यावी. आपल्या सजग राहण्याने आपण स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतो. ही एक बाब आणि परिस्थितीनुसार हे जर शक्य नसेल, तर पोलीस कायदा हे आपल्याला संरक्षण देऊ शकतात, न्याय देऊ शकतात ही जाणीव मुलींनी, महिलांनी आपल्यामध्ये विकसित करण्याची गरज आहे. पण त्यासाठी गरज आहे ती फक्त एकदा हिंमत दाखवायची, अन्यायाविरुद्ध खंबीरपणे पाऊल उचलण्याची.

मदत कुठे मिळू शकेल?

रस्त्यावरून जाताना महिला आणि मुली यांना बर्‍याचदा छेडछाडीच्या प्रकारांना सामोरं जावं लागतं. सर्वोच्च न्यायालयाने एक बाब ठासून सांगितली आहे की, महिलांसाठी तिचं स्त्रीत्व म्हणजेच तिचा विनय असतो आणि तिच्या स्त्रीत्वाला धक्का लागेल असं काहीही बोललं गेल्यास किंवा तशी केलेली कोणतीही कृती विनयभंगच ठरेल. अशा विनयभंगाविरुद्ध भारतीय संविधानात आयपीएसच्या अंतर्गत कलम ५0९, २९४ आणि ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करता येतो. महिलांना, मुलींना कोणत्याही प्रकारच्या छेडछाडीचा अनुभव आल्यास त्यांनी आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा. छेडछाडीचं स्वरूप लक्षात घेऊन पोलीस योग्य त्या कलमाखाली गुन्हा दाखल करून आरोपीला न्यायालयासमोर उभे करतात.
आयपीएसच्या कलम ५0९ अंतर्गत महिला/मुलींविरुद्ध ईल शब्द वापरणं, त्यांची छेडछाड काढणं, ईल हावभाव करणं याप्रकारचा विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो आणि या कलमाखाली आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला दंड आणि एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा होते. कलम २९४ अंतर्गत ईल गाणे म्हणणे, अर्वाच्य शिवी देणे, ईल चित्र दाखवणे या प्रकारच्या कृतीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जातो. आणि या कलमांतर्गत आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीस दंड आणि तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा होते. तर कलम ३५४ अंतर्गत महिलेचा/मुलींचा बळजबरीने हात पकडणे अथवा अशी काही कृती करणे ज्यामुळे महिलांना/मुलींना ती त्यांच्यावरील बळजबरी वाटेल, अशा कृतीविरुद्ध या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जातो आणि गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीस दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होते. तसेच रात्री-अपरात्री महिलांना/मुलींना अशा विनयभंगाचा सामना करावा लागला आणि त्यांना खूप असुरक्षित वाटल्यास अशा हेल्पलाइन आहेत, ज्या त्यांना मदत करण्यास तत्पर असतात.
१. महिला हेल्पलाईन नंबर - १२९८
२. पोलिस हेल्पलाईन नंबर - १0३
३. मानवी हक्क कायदा संपर्क - 0२२-२३४३९७५४१/२३४३६६९२
४. महिला हक्क संरक्षण समिती - 0२५३-२३१0१२९/२३९४२३५
५. महिला आणि बाल सहाय्य कक्ष - ९८८१९६५९५४
६. रचना ट्रस्ट श्ॉार्ट स्टे होम - 0२५३-२३४४२५७, २३४१४६२

काय आहे ‘विशाखा’?

अनेकदा कामाच्या ठिकाणीही महिलांना एक स्त्री म्हणून असुरक्षित वाटेल, असं वातावरण निर्माण केलं जातं किंवा सरळ सरळ त्यांच्यावर स्त्री म्हणून त्यांची मानहानी करणारे अत्याचार केले जातात. खरं तर या अत्याचारांना आळा घालणारा ठोस कायदा जरी अजून भारतात तयार झालेला नसला, तरी १९९७ मध्ये विशाखा विरुद्ध राजस्थान राज्य सरकारविरुद्धच्या खटल्यात दिलेल्या निकालात याविषयी काही मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांना आज कायद्याइतकेच वजन आहे. कारण भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद १४१ प्रमाणे सर्वोच्च न्यायालय जे आदेश किंवा निर्णय देतील त्याला कायदाच समजला जावा. यानुसार कामाच्या ठिकाणी महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘विशाखा’ अंतर्गत काही मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. त्यानुसार प्रत्येक शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयांमध्ये एक व्यवस्थापन समिती असावी, ज्यात ५0 टे महिला असतील. ही व्यवस्थापन समिती तयार करणे अत्यावश्यक म्हटले असले, तरी अजूनही महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, सिव्हिल हॅास्पिटल, मुक्त विद्यापीठ अशा र्मयादित ठिकाणीच अस्तित्वात आली आहे. या व्यवस्थापन समितीकडे कार्यालयातील महिलांना त्यांच्यावरील अत्याचाराविरुद्ध दाद मागता येते.
व्यवस्थापन समितीने अशा गुन्ह्यांविरुद्ध तयार केलेल्या अहवालाचा अभ्यास करून त्यावर निर्णय देण्यासाठी चौकशी समिती नेमली जाते. जी याची सखोल चौकशी करून निर्णय देते. या चौकशी समितीने दिलेला निर्णय अंतिम असतो. त्याविरुद्ध कुठेही दाद मागता येत नाही. आरोपीवरील आरोप सिद्ध झाल्यास अत्याचाराचे स्वरूप काय आहे त्यावरून आरोपीस निलंबन, बदली ते थेट सेवामुक्ती अशा स्वरूपाच्या शिक्षा दिल्या जातात.
विनयभंग, कामाच्या ठिकाणी महिलांवरील अत्याचार याबाबतची माहिती, याविषयी असलेल्या कायद्याच्या तरतुदींविषयीची आवश्यक माहिती-
www.departmental enquiry.com
nhrc.nic.in/hr issues.htrm
mahilaaayog.maharashtra.gov.in
या वेबसाइटवर वाचायला मिळेल
.
IAS OUR DREAM COMPLETED SEVEN YEARs ON AUGUST 13,2016

Blog Archive