विठ्ठल रामजी शिंदे यांचे आपल्यावर किती ऋण आहेत याची सध्याच्या काँग्रेसजनांना किती जाणीव आहे? स्वराज्येच्छू ब्राह्मण, सत्ताकांक्षी ब्राह्मणेतर आणि स्वोन्नतीसाठी धडपडणारे दलित या सर्वाकडून शिंदे नावाच्या महानायकावर महाकाव्य तर सोडाच पण एखादे चांगले कवनसुद्धा रचले नाही ही शोकांतिका शिंदे यांची आहे की आपणा सर्वाची?
Vitthal Ramji Shinde ==> Prarthana Samaj
and Paramhansa Samaj
मराठी समाजाचे उपेक्षित महानायक हे विठ्ठल रामजी शिंद्यांचे सर्वात समर्पक वर्णन ठरेल. विठ्ठलरावांच्या कार्याची सुरुवात धर्माचा प्रवक्ता आणि प्रचारक म्हणून झाली. एकोणिसाव्या शतकातील सामाजिक चळवळींना आधारभूत ठरलेल्या धार्मिक चळवळींमधील बंगालमधील 'ब्राह्मो' आणि महाराष्ट्रातील 'प्रार्थना' हे दोन महत्त्वाचे धर्मसमाज होत. महाराष्ट्रात या दोघांमधील सीमारेषा पुसट होत्या असे म्हणायलाही काही हरकत नसावी. पण प्रार्थना समाजाचे साक्षात पितृत्व द्यायचे झाले, तर ते दादोबा पांडुरंग यांच्या परमहंस सभेला द्यावे लागते. इतकेच नव्हे तर जे नाते परमहंस सभा आणि प्रार्थना समाज यांच्यात होते, तेच नाते परमहंस सभा आणि जोतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाज यांच्यात होते. अधिक स्पष्टपणे सांगायचे झाल्यास प्रार्थना समाज ही परमहंस मंडळीला फुटलेली अभिजनांची शाखा आणि सत्यशोधक समाज ही बहुजनांची शाखा होय.
परंतु असे असूनही या दोन समाजांमध्ये पुरेसा संपर्क आणि संवाद मात्र नव्हता. असलेच तर एकमेकांबद्दलचे गैरसमजच होते. खुद्द जोतिरावांना प्रार्थना समाज हे ब्राह्मणांचे नवे कारस्थान वाटायचे.
पण म्हणजे प्रार्थना समाजाच्या मंडळींची चांगलीच गोची झाली म्हणायचे. एकीकडे सत्यशोधकांना तो ब्राह्मणी वाटायचा आणि दुसरीकडे ब्राह्मणांना तो ख्रिस्तीधार्जिणा वाटायचा.
वैयक्तिक पातळीवर या वेगवेगळ्या समाजांमधील निवडक मंडळींचा एकमेकांशी संवाद होता. उदाहरणार्थ मोरो विठ्ठल वाळवेकर, सदाशिवराव गोवंडे, तुकाराम तात्या पडवळ यांचा परमहंस व प्रार्थना समाजांशी निकटचा संबंध होताच. पण जोतिरावांना त्यांचे मनापासून सहकार्यही होते. (असाच काहीसा प्रकार गंगारामभाऊ म्हस्के यांच्या बाबतीतही होता.) पण हे सर्व वैयक्तिक पातळीवरच राहिले. विठ्ठल रामजी शिंदे यांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी या साऱ्या सीमा ओलांडल्या; इतकेच नव्हे तर आधी सामाजिक की राजकीय हा प्रश्नही त्यांनी प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून सोडवला.
Ideological Casteism in Maharashtra !!
सामाजिक-राजकीय वादाचा दुसरा बहुजनांमधील आविष्कार अधिक जहाल होता. राजकीय सुधारणांचा अंतिम रोख ज्या स्वातंत्र्याकडे होता तेच आम्हाला तूर्त नको आहे, असा सत्यशोधकांचा व ब्राह्मणेतरांचा पवित्रा होता. सत्यशोधक समाजात राजकीय विषयांवर चर्चा करण्यास मनाई होती. शिक्षणाच्या अभावी आणि आर्थिक दुरवस्थेमुळे येणारे राजकीय स्वातंत्र्य पेलण्याची व भोगण्याची क्षमता शूद्रातिशूद्रांमध्ये नाही. त्याचा परिणाम म्हणून संभाव्य स्वराज्याची सर्व सूत्रे उच्चवर्णीयांकडे जातील व त्यातून पेशवाईची पुनरावृत्ती होईल अशी ही भूमिका होती. ही एक प्रकारची फोडायला अवघड अशी कोंडी होती. एक पेच होता. ही कोंडी फोडून पेच सोडवायचे श्रेय वि. रा. शिंद्यांचे. दक्षिण महाराष्ट्रातील एका छोटय़ा संस्थानात वारकरी कुटुंबात लहानाचे मोठे झालेल्या शिंद्यांना पुण्यात अनेक चित्रविचित्र अनुभव यायचे होते. त्यांची बहीण जनाक्काला तिचा नवरा नांदविणासा झाला, तेव्हा तिला शिकवून स्वावलंबी करण्यासाठी शिंद्यांनी अण्णा कव्र्याच्या स्त्री शिक्षण संस्थेचा दरवाजा ठोठावला, तेव्हा ब्राह्मणेतरांच्या मुलींना प्रवेश द्यायची वेळ अजून आली नाही, असे मासलेवाईक उत्तर साक्षात कव्र्याकडून त्यांना ऐकावे लागले. सत्यशोधकांच्या मनात रानडय़ांसकट सर्वच ब्राह्मणांबद्दल अढी असल्याचे त्यांना समजले. ब्राह्मण मराठय़ांना शूद्रच मानीत असल्याचे त्यांना कळून चुकले. त्याचबरोबर ज्यांनी एके काळी स्वराज्य स्थापन केले, स्वराज्याचे साम्राज्य केले ते मराठे ब्राह्मणांच्या भीतीपोटी आम्हाला स्वराज्याची गरज नाही. संभाव्य ब्राह्मणी राज्यापेक्षा आताच्या ब्रिटिशांची गुलामगिरी परवडली असे म्हणत होते. ब्राह्मणांच्या अंतर्गत जहाल आणि मवाळ यांच्यातून विस्तव जात नव्हता. जहाल मवाळांना देशद्रोही मानीत होते तर मवाळ जहालांना राजद्रोही!
एवढय़ा गदारोळात अस्पृश्य बांधवांची अवनती कोणाच्या गावीही नव्हती.
ब्राह्मोप्रचारक म्हणून कार्य करीत असतानाच शिंद्यांनी अस्पृश्यता निवारणाच्या कार्यासाठी स्वत:ला वाहून घेण्याचे ठरवले. सुदैवाने त्यांना या बाबतीत सर चंदावरकरांचे पूर्ण पाठबळ मिळाले.
'डिप्रेस्ड क्लास मिशन'ची स्थापना होऊन तिचे कार्य महाराष्ट्रात सुरू होऊन महाराष्ट्राबाहेरही पसरले. जागोजागी शाळा, वसतिगृहे निघाली. स्वत: शिंदे यांचा पडाव सहकुटुंब दलित वस्तीत पडला. नाना पेठेतील भोकरवाडीतील अहल्याश्रम हे अस्पृश्यतानिवारणाचे भारतातील केंद्र झाले.
He, Lokmanya Tilak &Political Life !!
सामाजिक व राजकीय ही सोयीची पण कृत्रिम भेदरेषा शिंद्यांना मानवण्यासारखी नव्हतीच. लोकमान्य टिळकांची चळवळ सरकारच्या डोळ्यांत खुपू लागली होती. टिळकांची सामाजिक क्षेत्रातील उदासीनता आणि 'जैसे थे'वादी धोरण शिंद्यांना माहीत नव्हते अशातला भाग नव्हता. पण टिळकांचे टिळकांपाशी. राजकीय क्षेत्रात त्यांच्याबरोबर जायला काय हरकत आहे असा विचार शिंद्यांनी केला. दरम्यान, टिळकांनीच सुरू केलेल्या मद्यपान निषेधाच्या चळवळीत ते सक्रिय सहभागी झाले. टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षांची शिक्षा होऊन त्यांची रवानगी मंडाले येथे झाली, तेव्हा त्यांचे शुभचिंतन करणारी उपासना शिंद्यांनी प्रार्थना समाजाच्या वेदीवरून चालवली हा त्या समाजाच्या टिळकविरोधी नेमस्त नेतृत्वाला जबरदस्त धक्का होता.
सहा वर्षांनी टिळक सुटून आले आणि थोडय़ाच दिवसांत महायुद्ध सुरू झाले. सरकार अडचणीत आहे हे पाहून टिळकांनी अॅनी बेझंटबाईंच्या बरोबर होमरुलची चळवळ सुरू करून स्वराज्याची मागणी पुढे रेटायला सुरुवात केली. त्याचा परिणाम होऊन सरकारने माँटेग्यू चेम्सफर्ड समिती नेमून राजकीय सुधारणांचा हप्ता देण्याचा निर्णय घेतला. त्यात प्रांतिक स्तरावरील मंत्रिपदाचाही समावेश असणार होता. त्यामुळे ब्राह्मणेतरांमध्ये व विशेषत: मराठा समाजात चलबिचल सुरू झाली. स्वराज्याच्या मागणीला पाठिंबा = टिळकांना पाठिंबा = ब्राह्मणांना पाठिंबा असे त्यांचे सरळसोट समीकरण होते. अशा वेळी शिंद्यांनी चक्क मराठय़ांची पर्यायी संघटना उभारून टिळकांना पाठिंबा देऊ केला. शनवारवाडय़ावर जंगी जाहीर सभा घेऊन तिच्यात टिळकांना ब्राह्मणांच्या वतीने बोलण्यास भाग पाडले. बेळगाव येथे राष्ट्रीय मराठा लीगचे अधिवेशन घेऊन स्वराज्येच्छूंचे हात बळकट केले.
Elections!
शेवटी नवी योजना मंजूर झालीच आणि त्यानुसार निवडणुकाही जाहीर झाल्या. मराठा जातीसाठी राखीव ठेवलेल्या जागेवर निवडणूक लढवण्याला नकार देऊन शिंद्यांनी केवळ आर्थिक पायावर उभा असलेला बहुजन पक्ष काढला व निवडणूक लढवली. शिंद्यांचा हा स्वतंत्र बाणा त्या काळात शाहू छत्रपतींसह कोणत्याच ब्राह्मणेतर नेत्याला परवडण्यासारखा नव्हता. परिणाम व्हायचा तोच झाला. शिंदे पराभूत होऊन राजकारणातून बाहेर फेकले गेले. इकडे त्यांनीच स्थापन केलेल्या डी. सी. मिशनमध्येही त्यांच्या कार्यावर आक्षेप घेण्याचे राजकारण झाले व त्यांना तेथूनही बाहेर पडावे लागले.
या सर्व खचवून टाकणाऱ्या अशा प्रतिकूल घटना घडत असताना शिंद्यांनी आपल्या मतांना मुरड घालून तडजोड कधीच केली नाही. क्षात्र जगद्गुरुपीठ स्थापन करण्याविषयी नापसंती व्यक्त करून त्यांनी शाहू महाराजांचा रोष पत्करला तर राजकारणात टिळकांना पाठिंबा देत असतानाच टिळकांची स्त्रिया आणि अस्पृश्यांबाबतची मते न पटल्याने टिळक परिपूर्ण पुढारी नसल्याचा स्पष्ट उच्चार करून टिळकांना देण्यात येणाऱ्या मानपत्रावर सही करण्यास नकार दिला. मुला-मुलींच्या सक्तीच्या मोफत शिक्षणाचा प्रश्न आला असता आर्थिक अडचणीची सबब सांगत तूर्त फक्त मुलांची सोय करू असे म्हणत चालढकल करणाऱ्या टिळकानुयायांना त्यांनी असे असेल तर आधी मुलींना शिकवा असा सल्ला देऊन शहरातून मोठा मोर्चा काढला.
शिंदे पट्टीचे विद्वान, अभ्यासक आणि संशोधक होते. अस्पृश्यतेच्या प्रश्नाचा मागोवा घेताना त्यांची विद्वत्ता व निरपेक्षता कसाला लागली. त्याला ते उतरलेसुद्धा. इतिहासाचार्य राजवाडय़ांसारख्या जबाबदार विद्वानाला जातीयतेबरोबर वाहवत जाताना पाहून शिंद्यांनी त्यांचा योग्य वेळी व योग्य पद्धतीने बंदोबस्त केला. पण इतिहासाची खरी मौज तर पुढेच आहे.
शिंद्यांच्या स्वराज्यवादी हालचालींना विरोध करून त्यांना राजकारणातून उठवण्यात आले खरे. पण शेवटी त्यांच्याच राजकारणाचा विजय व्हायचा होता. शाहू छत्रपतींच्या निधनानंतर नेतृत्वहीन झालेल्या ब्राह्मणेतरांना त्यांनी योग्य वेळी काँग्रेसच्या चळवळीत प्रवेश करायचा व गांधींच्या पाठीशी उभे राहायचा सल्ला दिला. त्यासाठी नव्या राजकीय तत्त्वज्ञानाची मांडणी केली. 'परोपदेशे पांडित्यं' नको म्हणून स्वत: सत्याग्रह करून तुरुंगवास पत्करला. त्यांचा सल्ला केशवराव जेधे प्रभृतींनी शिरोधार्य मानला व महाराष्ट्रातील बहुजन समाज काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीत प्रविष्ट झाला. यथावकाश त्याने सत्ताही काबीज केली. शिंद्यांचे आपल्यावर किती ऋण आहेत याची सध्याच्या काँग्रेसजनांना किती जाणीव आहे हे मला ठाऊक नाही. ती पुरेशी नसण्याचीच शक्यता अधिक. स्वराज्येच्छू ब्राह्मण, सत्ताकांक्षी ब्राह्मणेतर आणि स्वोन्नतीसाठी धडपडणारे दलित या सर्वाकडून शिंदे नावाच्या महानायकावर महाकाव्य तर सोडाच, पण एखादे चांगले कवनसुद्धा रचले नाही, ही शोकांतिका शिंद्यांची आहे की आपणा सर्वाची? ती कोणाचीही असो पण आपण आपल्यातलाच एक चौकोनी चिरा, अष्टपैलू हिरा उपेक्षिला हे मात्र खरे. एका परिपूर्ण नेत्याला तो आपल्या चौकटीत बसत नाही व त्याला मुडपता येत नाही, दुमडता येत नाही, छाटून कमीही करता येत नाही. तो नव्हताच, नाहीच असे समजा. प्रश्न परस्परच सुटतो.